आपल्याला जी मुक्ती मिळाली ती संपूर्ण मुक्ती आहे का? येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून प्राप्त झालेली मुक्ती आणि त्यांच्या दुसऱ्या आगमनात त्यांच्याद्वारे प्राप्त होणारी मुक्ती प्रभूच्या वचनात विभाजित करून लिहिली आहे.
अद्याप पूर्ण न झालेले तारण
– २
II. अद्याप पूर्ण न झालेले तारण
आपण जे तारण
प्राप्त केले आहे, ते संपूर्ण तारण आहे का? प्रत्यक्षात, जे लोक स्वतःला “आम्हांला
तारण मिळाले आहे” असे म्हणतात, त्यांनी ते तारण पूर्ण आहे की नाही याचा विचारच केलेला
नाही. देवपित्यांनी आपल्या मुलांनी कोणते तारण प्राप्त करावे अशी जी योजना व इच्छा
ठेवली आहे, ते तारण नेमके काय आहे, याची त्यांनी चौकशी केली नाही. तारणहारासाठी आणि
अजून प्राप्त होणाऱ्या तारणासाठी पुन्हा प्रतीक्षा करणे आवश्यक आहे का, याचाही कोणी
विचार केला नाही. ख्रिस्ती लोकांना असे वाटत राहिले की तारणहारासाठी प्रतीक्षा करणे
म्हणजे येशू ख्रिस्त तारणहार आहेत हे नाकारणे
होय.
परंतु देवाचे
वचन आपण अजून प्राप्त करावयाच्या तारणाबद्दल शिकवते का? देवाचे वचन स्पष्टपणे ह्या
दोन गोष्टींमध्ये फरक करते की येशू ख्रिस्त
जो देवपित्याचा एकुलता एक पुत्र आहे त्यांच्या द्वारे आपण जे तारण प्राप्त केले आहे
आणि त्याच येशू ख्रिस्ताद्वारे, आपण जे तारण अजून प्राप्त करावयाचे आहे . पण या तारणाविषयी
लोकांना कोणी शिकवले नाही. देवाचे वचन वारंवार सांगत असतानाही की देवाची प्रजा अजून
एका उदात्त, श्रेष्ठ तारणाची वाट पाहत आहे, तरीही लोकांना ते शोधण्यासाठी कोणी तयार
केले नाही. कारण तथाकथित विद्वान आणि अधिकारस्थानी असलेले लोक, देवाच्या वचनाला निष्फळ ठरवणाऱ्या शिकवणींचे समर्थक आणि लाभार्थी
बनले आहेत. खोट्या ज्ञानाच्या विरोधाभासाने
त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत
अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो येशू ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश
त्यांच्यावर प्रकाशू नये. (२ करिंथ. ४:३–४). ते सत्याच्या परिपूर्णतेपर्यंत
पोहोचू शकले नाहीत. त्यांनी देवाचे राज्य शोधणे सोडून दिले आणि या जगाच्या राज्याचे
सेवक व लाभार्थी बनले. परंतु देवाचे वचन साक्ष देते की या तारणाच्या गूढ गोष्टींकडे
डोकावून पाहण्याची उत्कंठा देवदूतांनाही आहे (१ पेत्र. १:५–१२).
मग प्रत्यक्षात आपण कोण आहोत? देवाने आपल्या मुलांची निर्मिती का केली? देव आपल्या मुलांद्वारे सैतान आणि दुष्ट आत्म्यांचा नाश कसा करणार आहे? देवाने आपल्या मुलांसाठी कोणती समृद्धी व वैभव सिद्ध केले आहे? शेवटच्या काळात देव आपल्या पुत्राद्वारे कोणती तारणाची योजना अमलात आणणार आहे? मनुष्य कसा धन्य होईल? देवाची मुले देवाच्या अनंत राज्याचा वारसा कसा मिळवतील? केवळ तेच लोक, जे देवाच्या उदात्त विचारांना आणि कल्पनांना स्वीकारतात, तेच देव पित्याची आपल्या मुलांविषयी असलेली स्वप्ने आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याने आखलेल्या योजना समजू शकतात (यशया ५५:८–९). देव जेव्हा ही दैवी गूढ़ उघड करतो, तेव्हा जे लोक ती समजून घेतात, तेच येशू ख्रिस्त देणार अशा तारणाची वाट पाहू शकतात आणि त्यासाठी स्वतःला तयार करू शकतात.
खरे तर, मनुष्य
आणि त्याच्या अल्प आयुष्याच्या दृष्टीने पाहता, देवाची ही योजना पूर्ण होण्यासाठी लागणारा
काळ फार मोठा वाटू शकतो. पण असे वाटण्याचे कारण म्हणजे आपण देवाचा ‘काळ’ आणि मनुष्याचा
‘काळ’ यांतील फरक ओळखू शकत नाही. देव अनंतकाळात वास करतो आणि देवाची मुलेही अनंतकाळासाठी
जगणार आहेत. अनंततेच्या किंवा अमर्यादतेच्या तुलनेत, या पृथ्वीवरील मनुष्याची काही
वर्षे म्हणजे महासागरातील पाण्याचा एक थेंब किंवा वाळूचा एक कण इतकीच आहेत (बेनसिरा
१८:१०).
आपण अजून
एक तारण प्राप्त करायचे आहे, ही गोष्ट देवाच्या पुस्तकात सर्वत्र नमूद केलेली आपण पाहू
शकतो.
अ. मनुष्य अजून शापातून पूर्ण मुक्त झालेला नाही
तारण म्हणजे
शिक्षेपासून किंवा शापापासून मिळणारी मुक्ती नव्हे काय? पापामुळे मनुष्यावर कोणता शाप
आला, हे समजल्याशिवाय तारणाची गरज आपल्याला स्पष्टपणे जाणवू शकत नाही. एदेन बागेत मनुष्य
ज्या गुलामगिरीत पडला, त्यातून तो पूर्णपणे मुक्त झाला, तरच तारण पूर्ण झाले असे म्हणता
येईल.
मानव हा आत्मा,
मन आणि शरीर यांचा बनलेला आहे. मनुष्याला देवाच्या प्रतिमेत व स्वरूपात निर्माण करण्यात
आले (उत्पत्ती१:२६-२८). देवाची प्रतिमा म्हणजे त्याची महिमा; आणि देवाचे
स्वरूप म्हणजे त्याचे अनंतत्व. म्हणजेच, देवाने आपल्या मुलांना सदैव तरुण, अविनाशी
जीवनासह निर्माण केले. देवाने मनुष्याला आपली महिमा दिली आणि सर्व सृष्टीवर अधिपत्य
दिले. (बेनसिरा.१७:३-४, ज्ञानग्रंथ.२:२३).
परंतु सैतानाच्या
खोट्यावर विश्वास ठेवून देवाची आज्ञा मोडल्यामुळे मनुष्याने हे सर्व गमावले. पापामुळे
केवळ आत्माच नव्हे, तर मन आणि शरीरही शापाच्या अधीन झाले. मनुष्याने अनंत जीवन गमावले.
(शरीराचे जीवन रक्तात असते). (लेवीय. १७:११) त्यामुळे मनुष्य रोग, वार्धक्य
आणि मृत्यू (एका शब्दात नश्वरता) यांचा गुलाम झाला.
येशू ख्रिस्तापासून तारण प्राप्त केलेला पौल म्हणतो: “किती मी कष्टी माणूस! मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?” (रोम. ७:२४) येथे पौल आत्म्याला शरीरापासून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करीत नाही. जर आत्म्याची शरीरापासून मुक्तता हेच खरे तारण असते, तर देवाने मनुष्याला शरीरच निर्माण केले नसते आणि त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकीला नसता. (उत्पत्ती. २:७); तसेच त्या शरीरात आत्मा ओतला नसता. (उपदेशक. ११:५, याकोब. ४:५). येथे शरीराच्या मुक्ततेबद्दल (उद्धाराबद्दल) सांगितले आहे. म्हणूनच देवाचे वचन साक्ष देते: “इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तक पणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहोत, कारण आपण अशी आशा धरून तरलो...” (रोम. ८:२३-२४). ह्या प्रार्थनेला अजूनही उत्तर मिळाले नाही!
मनुष्याच्या
पतनामुळे भूमी आणि सृष्टीही शापाच्या अधीन झाली. आजही संपूर्ण सृष्टी नश्वरतेच्या अधीन
आहे (रोम. ८:१९-२०,२२). देवाने सर्व सृष्टी अशी घडविली की ती देवाच्या
संततीसाठी फळे धारण करील आणि त्यांची सेवा करील. पण आज जी सृष्टी व्यर्थतेच्या गुलामगिरीत
अडकली आहे, ती देवाच्या संततीची सेवा करू शकत नाही. जोपर्यंत मनुष्य देवाच्या पुत्रांच्या
स्वातंत्र्याला पोहोचत नाही, तोपर्यंत व्यर्थतेच्या गुलामगिरीत अडकलेली सृष्टीही मुक्त
होऊ शकणार नाही. म्हणून देवाचे वचन म्हणते: “कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट
होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात
आली ती आपखुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टीही स्वतःच्या नश्वरतेच्या
दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट
पाहते कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे”
(रोम. ८:१९-२२).
मनुष्याची
परिपूर्णता म्हणजे त्याचे शरीर, आत्मा आणि जीवन पूर्णपणे निर्दोष असणे (म्हणजेच मनुष्याचे
परिशुध्द, अमर, अविनाशी आणि महिमामय होणे) (१ थेस्सलनी ५:२३). देवामध्ये
ही परिपूर्णता आहे. म्हणूनच येशू ख्रिस्ताने आपल्याला उपदेश केला: “जसा तुमचा
स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा” (मत्तय. ५:४८).
मानवजातीने ही परिपूर्णता अद्याप प्राप्त केलेली नाही. या सर्वांवरून हे स्पष्ट होते
की मनुष्याला अजून एक तारण प्राप्त करायचे आहे.
ब. देवाने ज्या हेतूसाठी मनुष्य
निर्माण केला, त्यासाठी त्याला पात्र झाले पाहिजे.
देवाने त्यांच्या
मुलांना (मनुष्याला) परिशुध्द, निर्दोष व प्रेमात त्याच्यासोबत अनंतकाळ त्यांच्या समक्षतेत
राहण्यासाठी निर्माण केले (इफिसी. १:४). देह आणि मन यांशिवाय आपण कोणावरही प्रेम करू
शकत नाही. प्रेम जर निर्दोष (शुद्ध) असावे, तर पाप आपल्या देहातून दूर झाले पाहिजे.
परंतु आता देखील आपल्या देहात पाप आहे (१ योहान १:८; रोम ७:२१–२४). त्यासाठी पाप व
मृत्यूचा नियम आपल्या देहातून काढून टाकला गेला पाहिजे (१ करिंथकर १५:५६). मनुष्याचा
देह नश्वरतेच्या नियमाच्या गुलामगिरीतून मुक्त केला गेला पाहिजे. मनुष्याला अनंतकाळ
जगायचे असेल, तर त्याच्याकडे अमर आणि अविनाशी देह असला पाहिजे. त्यासाठी मृत्यूचा पूर्णपणे
नाश झाला पाहिजे. बायबल सांगते की हे निश्चितपणे या पृथ्वीवर घडणार आहे. परंतु आतापर्यंत
असे घडलेले नाही.
क. मनुष्याला अजून अनंत जीवन
प्राप्त करायचे आहे
पाप करून
नश्वरतेचा गुलाम बनलेल्या मनुष्याच्या अंतःकरणातील सर्वात मोठी इच्छा म्हणजे अनंत जीवन
प्राप्त करणे. देहाचे जीवन रक्तात आहे (लेवीय १७:११). म्हणून अनंत जीवन
म्हणजे अमर व अविनाशी देहासह देवाबरोबर सदैव वास करणे होय. नश्वरतेचा गुलाम बनलेल्या
मनुष्याला देवाने दिलेले हेच वचन आहे (१ योहान २:२५). अनंत जीवन हेच
तारणाची परिपूर्णता आहे.
मनुष्याच्या
देहाचा उद्धार केवळ पुनरुत्थान व रूपांतर यांद्वारेच होतो. ही दोन्ही घटना अजूनही या
पृथ्वीवर घडायच्या आहेत (१ करिंथकर १५:५१–५५). देवाचे वचन स्पष्टपणे
शिकवते की आजपर्यंत कोणीही अनंत जीवन प्राप्त केलेले नाही किंवा परिपूर्णतेला पोहोचलेले
नाही (इब्री ११:३९–४०).
देवाचे वचन
सांगते: “तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले
आहे आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात
प्रकट केले जाल” (कलस्सैकर ३:३–४).
येशू ख्रिस्त
गौरवाने प्रकट होईल त्याच ठिकाणी आपण अनंत जीवन प्राप्त करू. देवाचे वचन पुन्हा जाहीर
करते: “प्रभू सियोन बांधील; तेथे तो आपल्या गौरवाने प्रकट होईल” (स्तोत्र १०२:१६).
तेथे येशू ख्रिस्त आमचे दैन्यावस्थेंतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरांसारखे
व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील. (फिलिप्पैकर ३:२०–२१).
आपण अजूनही
अविनाशी जीवन प्राप्त करायचे आहे –असे जीवन जिथे वार्धक्य, रोग आणि मृत्यू नाहीत. यावरून
हे स्पष्ट होते की तारणाची परिपूर्णता आपण अजून प्राप्त करायची आहे.
ड. देवाला पाहण्यासाठी आणि देवाबरोबर वास करण्यासाठी
आपल्याला अजूनही तारण प्राप्त करावयाचे आहे.
देवाने मनुष्याला
स्वतःबरोबर वास करण्यासाठी निर्माण केले. देव हा प्रेमळ पिता आहे; तो आपल्या मुलांबरोबर
राहण्याची तीव्र इच्छा बाळगतो आणि आपल्या मुलांनी त्याच्या विसाव्यात प्रवेश करावा
अशी त्याची इच्छा आहे (प्रकटीकरण २१:१–३; इब्री ४:८–१०).
परंतु देवाने
मोशेला सांगितले: “... तू माझा चेहरा पाहू शकत नाहीस; कारण कोणताही मनुष्य मला
पाहून जिवंत राहणार नाही” (निर्गम ३३:२०). याचा अर्थ असा की मनुष्य अद्याप
देवाला समोरासमोर पाहण्यास योग्य ठरलेला नाही. परंतु अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे
की एकदा आपण ही क्षमता प्राप्त करू (स्तोत्र ८४:७).
देवाचे वचन
आपल्याला हे वचन देते: “आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यांत पित्याने आपल्याला
केवढे प्रतिदान दिले आहे. पाहा; आणि आपण तसे आहोच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत
नाही कारण त्यांनी त्यांना ओळखले नाही. प्रियजनहो, आता आपण देवाची मुलं आहोत आणि पुढे
आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही, तरी ते प्रकट होतील तेव्हा आपण त्यांच्यासारखे
होऊ हे आपल्याला माहित आहे, कारण जसे ते आहेत तसेच ते आपल्याला दिसतील. जो कोणी त्यांसंबंधाने
अशी आशा बाळगतो तो जसे ते परिशुद्ध आहेत तसे आपल्यालाही विशुद्ध करतील” (१ योहान ३:१–३).
आपण अजूनही
देवाला जसे आहेत तसे पाहण्यासाठी आणि ओळखण्यासाठी योग्य बनविले जाणार आहोत (१
करिंथकर १३:१२).
इ. देवाचे राज्याचे वारसदार
होण्यासाठी अजूनही आपल्याला तारण प्राप्त करावयाचे आहे.
देवाची इच्छा
आहे की त्यांच्या मुलांनी अनंत जीवनाचे वारसदार व्हावे. बायबलमध्ये एका कळपाचा उल्लेख
आहे, ज्याला राज्य देण्यात देव प्रसन्न आहे (लूक १२:३२). येशू ख्रिस्तानेही
वचन दिले आहे की तो आपले राज्य एका कळपाला (त्याच कळपाला) देईल (लूक २२:२८–३०).
हेच देवाचे तिसरे राज्य आहे, जे येशू ख्रिस्ताने जाहीर केले आहे! जर आपण देवाच्या वचनाचा
अभ्यास केला, तर आपल्याला दिसून येते की आजपर्यंत मनुष्याने जी देवाची राज्ये प्राप्त
केली आहेत, ती या अनंत देवाच्या राज्याकडे नेणाऱ्या केवळ तात्पुरत्या पायऱ्या आहेत.
हेच देवाचे
राज्य आहे जे सामर्थ्याने खाली येते (मार्क ९:१). हेच देवाचे राज्य आहे
जे आपल्या डोळ्यांनी पाहता येईल (योहान ३:३). खरं तर, येशू ख्रिस्ताने
आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास सांगितले की देवाचे हे राज्य यावे (मत्तय
६:९–१०).
हेच देवाचे
राज्य आहे जिथे देवाची मुले सर्व वडीलजनांबरोबर, धार्मिक जनांबरोबर आणि संदेष्ट्यांबरोबर
मेजवानीस बसतील (मत्तय ८:११). हेच देवाचे राज्य आहे जिथे एक कळप देवपुत्राच्या
सिंहासनांवर बसेल आणि इस्राएलच्या बारा वंशांचा न्याय करील (लूक २२:२८–३०). मेजवानीस
बसण्यासाठी आणि न्याय करण्यासाठी सिंहासनांवर बसण्यासाठी आपल्याला देहाची आवश्यकता
आहे.
परंतु देवाचे वचन सावध करते: बंधूंनो आणि भगिनींनो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही” (१ करिंथकर १५:५०). याचा अर्थ असा की देवाच्या राज्याचा वारसा मिळवण्यासाठी आपला देह अमर आणि अविनाशी बनला पाहिजे, कारण देवाचे तिसरे राज्य हे अविनाशी राज्य आहे. आजपर्यंत कोणत्याही मनुष्याचा देह अमर आणि अविनाशी झालेला नाही. केवळ येशू ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा, तो मृतांना पुनरुत्थान देईल आणि जिवंत संतांना रूपांतर देईल; तेव्हाच वरील उल्लेख केलेला कळप अमर आणि अविनाशी बनेल (१ करिंथकर १५:५१–५५).
देवाचे वचन
साक्ष देते की देवाचे विशुद्ध जन हेच या अनंत राज्याचे वारस होतील:राज्य प्रभुत्व
व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव ही परात्पर देवाची प्रजा जे विशुद्ध जन यांस देण्यात
येतील त्यांचे राज्य सनातन आहे सर्व सत्ताधीश त्यांची सेवा करतील, त्यांचे अंकित होतील”
(दानिएल ७:२७).
देवाच्या
राज्याचा वारस होणारे हे विशुद्ध जन कोण आहेत? देवाचे विशुद्ध जन म्हणजे त्याची प्रथम
जन्मलेली मुले आहेत (लूक २:२३; इब्री १२:२२–२४). देवाचे वचन साक्ष देते
की देवाचा एक कळप आहे ज्याला “प्रथम जन्मलेले” असे म्हटले जाते. हा देवाच्या मुलांचा
कळप आहे, जो देवपुत्र येशू ख्रिस्ताबरोबर देवाकडून जन्मलेला आहे. जरी ते आधी आदामामध्ये
ठेवले गेले असले, तरी पृथ्वीवर त्यांचा जन्म केवळ शेवटच्या काळात होतो (१ पेत्र
१:५).
हा तो कळप
आहे जो पाप व नश्वरतेच्या नियमांपासून मुक्त होऊन, देवपित्याच्या देह व रक्तात सहभाग
प्राप्त करून, देवाचे खरे पुत्रत्व मिळवतो (रोम ८:१९–२४; इफिसकर १:५). ज्यांचा
आत्मा, देह आणि जीवन येशू ख्रिस्ताच्या तेजस्वी प्रकटीकरणाच्या वेळी विशुद्ध व परिपूर्ण
केले जातील, तोच कळप देवाच्या राज्याचा वारसा घेईल (१ थेस्सलनीकाकर ५:२३).
हाच तो कळप आहे ज्याला देवाने आपल्या प्रिय मुलांबरोबर राहण्यासाठी बोलावले आहे (यिर्मया
३:१९). देवाच्या इच्छेनुसार जे आधी परिपूर्ण केले जाणार आहेत, ते हेच आहेत
(इब्री ११:३९–४०).
आपल्या दुसऱ्या
आगमनाची आणि युगांच्या समाप्तीची चिन्हे सांगताना येशू ख्रिस्ताने इशारा दिला: त्याचप्रमाणे,
जेव्हा तुम्ही या गोष्टी घडताना पाहता, तेव्हा जाणून घ्या की देवाचे राज्य जवळ आले
आहे” (लूक २१:३१). हेच देवाचे राज्य आहे जे येशू ख्रिस्ताच्या तेजस्वी प्रकटीकरणाच्या
वेळी खाली येते. हे राज्य आपण अजून प्राप्त करायचे आहे.
फ. देवाची मुले अजून वचन दिल्याप्रमाणे धन्य व्हायची
आहेत
आज लोक “अनुग्रह”
या शब्दाचा जो अर्थ लावतात, तो देवाच्या दृष्टीने खरा अर्थ नाही. देवाच्या दृष्टीने
खरा अनुग्रह म्हणजे शापाच्या अगदी विरुद्ध असलेली अवस्था. एदेन बागेत देवाने मनुष्याला
दिलेला अनुग्रह आज्ञा पालन न केल्यामुळे हरवला. म्हणून आपल्या मुलांवर प्रेम करणाऱ्या
देवाने सर्वप्रथम त्यांना अनुग्रहचे वचन दिले. अनुग्रह
म्हणजे सैतानाचा (जो मनुष्यावरील शापाचा कारणीभूत आहे) नाश करून, देवाने मनुष्याला
जे काही पूर्णतेने दिले होते, त्याची संपूर्ण पुनर्स्थापना. (उत्पत्ती. ३:१५).
देवाची मुले तेव्हाच खऱ्या अर्थाने धन्य ठरतील, जेव्हा देवाने त्यांच्या साठी जे काही
तयार केले आहे ते सर्व त्यांना प्राप्त होईल (१ करिंथ. २:९). देवाची
मुले तेव्हाच खऱ्या अर्थाने धन्य ठरतील, जेव्हा ती देव पिता जसा परिपूर्ण आहे तशी परिपूर्ण
होतील (मत्तय ५:४८; योहान १०:३५).
हेच वचन देवाने
हव्वाला आणि अब्राहामाला दिले होते. अब्राहामाला दिलेले वचन असे होते की पृथ्वीवरील
सर्व कुळे तुझ्या संततीच्या द्वारे अनुग्रहीत
होतील (उत्पत्ती २२:१८; प्रे. कृत्ये ३:२५). हे लक्षात घेतले पाहिजे
की आजपर्यंत अब्राहाम, किंवा इतर कोणतेही वडिलजन, संदेष्टे किंवा प्रेषित यांनी हा
अनुग्रह प्राप्त केलेला नाही (इब्री. ११:३९–४०; २ तीम. ४:७–८; फिलि. ३:११–१४).
मनुष्य जर
अनुग्रहीत व्हायचा असेल, तर शाप आणि नाशाचा कारणीभूत असलेला सैतान चिरडला गेला पाहिजे.
हेच आव्हान देवाने एदेन बागेत सैतानाला दिले होते (उपत्ती. ३:१५). देवाचे
आव्हान असे होते की—ज्या स्त्रीला सैतानाने फसवले, त्याच स्त्रीचा वंशज सैतानाचे मस्तक
चिरडेल.
परंतु ख्रिस्ती
लोक जसे समजतात तसे, येशू ख्रिस्त हा हव्वाचा तो वंशज नाही जो सैतानाचा नाश करतो. येशू
ख्रिस्त देवापासून जन्मलेला आहे (योहान १:१३); तो देवाच्या तत्वांचे
प्रतिरूप आहे (इब्री. १:३); तो देहधारण केलेले देवाचे वचन आहे (योहान
१:१४). तो आदामाचा वंशज नाही, जो मातीपासून निर्माण झाला. देवाचे वचन सांगते
की एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले; आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि
सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. (रोम. ५:१२).
पाप प्रत्येक मनुष्यात वास करते (रोम. ७:१९–२४; १योहान २:८). परंतु देवाचे
वचन हेही शिकवते की येशू ख्रिस्तामध्ये पाप नाही, आणि तो आपली पापे हरण करण्यासाठीआला.
(१ योहान ३:५). म्हणूनच येशू ख्रिस्त हा हव्वाचा वंशज नाही.
तसेच, येशू
ख्रिस्ताने अद्याप सैतानाचा नाश केलेला नाही. जर सैतान नष्ट झाला असता, तर आज जगात
पाप नसते; पापाचे वेतन असलेला मृत्यू नसता; मनुष्याला देह, जग आणि निसर्गाच्या नियमांनी
गुलाम केले नसते; सृष्टी निरर्थकतेच्या गुलामगिरीत नसती; आणि देवाची मुले अमर झाली
असती व अनुग्रह प्राप्त केला असता.
देवाने आधीच
ठरवले होते की सैतानाचा नाश देवाचा पुत्र येशू ख्रिस्त नव्हे, तर हव्वाचा वंशज करील.
देवाची मुलेच सैतानाला चिरडतील. (रोम. १६:२०). हे देवाने देवाच्या मुलांचे
गौरव करण्यासाठी ठरवले आहे. परंतु हे करण्यासाठी
त्यांना आधी देवाच्या पुत्राद्वारे सर्व गुलामगिरीतून मुक्त केले गेले पाहिजे. देवाने
आधीच ठरवले होते की देवाची सर्व मुले येशू ख्रिस्ताद्वारे मुक्त केली जातील. (इफिसी.
१:५). हे अजून घडायचे आहे.
ग. केवळ त्यांचे तारण झाले तेच वर उचलले जातील
देवाचे वचन
शिकवते की “शेवटच्या तुतारीचा नाद होत असता आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने
उठतील नंतर जिवंत उरलेले आणि आपण त्यांच्या मेंढरांपैकी जे जिवंत असतील त्यांचे रूपांतर
केले जाईल. त्यानंतर ज्यांचे रूपांतर झाले आहे आणि जे पुनरुत्थान पावले आहेत, ते सर्व
ढगांमध्ये उचलले जातील. (१ थेस्सलनी ४:१६–१७).
लोकांच्या
कल्पनाशक्तीला सर्वाधिक भुरळ घालणारी गोष्ट म्हणजे ज्याला ते “रॅप्चर” (येशू ख्रिस्ताच्या
दुसऱ्या आगमनाच्या वेळी वर उचलले जाण्याचा आनंद) म्हणतात. पण प्रश्न असे आहेत — कोण
वर उचलले जातील? ते कुठे घडेल? रॅप्चरपूर्वी कोणत्या गोष्टी घडणे आवश्यक आहे? अंतीम
काळातील तारणाशी रॅप्चरचा काय संबंध आहे? या प्रश्नांची खरी उत्तरे देवाने अंतीम काळासाठी
राखून ठेवलेली तारणाची रहस्ये उघड केल्यावरच मिळू शकतात (१ पेत्र १:५).
देवाने आपली रहस्ये उघड करण्यापूर्वी लोक आपल्या मनातून जे विचार काढतात, ते दैवी विधान
नसतात.
खरे आहे की
सर्व लोक मनुष्यपुत्राला मेघांमध्ये येताना पाहतील. पण देवाचे वचन स्पष्ट सांगते की
पृथ्वीवरील लोक त्याला येताना पाहून रडतील आणि येणाऱ्या संकटाच्या भीतीने बेशुद्ध पडतील
(प्रकटी. १:७; मत्तय २४:३०; लूक २१:२६–२८). म्हणून सर्व लोक वर उचलले
जाणार नाहीत, हे निश्चित आहे.
येशू ख्रिस्ताच्या
दुसऱ्या आगमनात जे त्याचे आहेत, तेच प्रथम पुनरुत्थान व रूपांतर प्राप्त करतील (१
करिंथ.१५:२३). परिशुद्ध शास्त्र हे स्पष्ट सांगते की येशू ख्रिस्ताच्या तेजस्वी
प्रकटीकरणाच्यावेळी कोण त्याचे असतील. पुनरुत्थान आणि रूपांतर कुठे होईल, हेही शास्त्रात
लिहिले आहे. फक्त त्या ठिकाणाहूनच एक कळप देवाला भेटण्यासाठी वर उचलला जाईल.
याशिवाय,
सध्याच्या अवस्थेत मनुष्याला हवेत उडण्याची क्षमता नाही. देवाचे वचन साक्ष देते की
आपले शरीर अनेक नियमांच्या अधीन आहे, जे आपल्याला तसे करण्यापासून अडवतात. देह आणि
निसर्गाच्या नियमांतून मुक्त झाल्याशिवाय आपण जमिनीवरून वर जाऊ शकत नाही. आज आपल्याकडे
असलेले मांस व रक्त देवाच्या राज्यांचे वतन मिळवू शकत नाहीत.(१ करिंथ. १५:५०).
देवाच्या
मुलांना अजून तारण प्राप्त करावयाचे आहे. पण ते तारण मेघांमध्ये वर उचलल्यानंतर नव्हे,
तर त्याआधी मिळेल. येशू ख्रिस्ताने पुन्हा एकदा या पृथ्वीवर देहात येऊन, आपल्या दुर्बल
देहांचे रूपांतर स्वतःच्या तेजस्वी देहासारखे करणे आवश्यक आहे (इब्री. ९:२८;
फिलि. ३:२०–२१). म्हणूनच हे स्पष्ट आहे की पुनरुत्थान आणि रूपांतर या पृथ्वीवरच
घडले पाहिजे. यासाठी जे या तारणाचे वारस होणार आहेत, त्यांना एका ठिकाणी एकत्र केले
जाईल (योहान १०:१६) आणि त्यासाठी तयारीचा काळ आवश्यक आहे. (इब्री.
१२:९–१२). जे लोक या पृथ्वीवरच देवाच्या पुत्राकडून तारण प्राप्त करतात, त्यांनाच
या पृथ्वीवरून वर उचलले जाईल.
अंतीम काळात
देव जे तारण प्रकट करणार आहे, त्यासंबंधी देवाच्या वचनातील सर्व वचने या पृथ्वीवरच
पूर्ण झाली पाहिजेत. तारण म्हणजे स्वर्गात गेल्यावर मिळणारी गोष्ट नाही. जर तारण स्वर्गात
गेल्यावरच मिळणार असते, तर तारणाऱ्याला येण्याची गरजच नसती. देवाने आपल्या वचनाद्वारे
आपल्याला स्वर्गातून येणाऱ्या तारणाऱ्याची वाट पाहायला सांगितले नसते. (फिलि.
३:२०). देव आपल्याला थेट स्वर्गात घेऊन जाऊन वाचवू शकला असता.पण आपल्याला माहित
आहे की ते देवाच्या योजनेत नव्हते आणि नाही. यावरून हे स्पष्ट होते की देवाच्या वचनाने
साक्ष दिलेले तारण, देवाच्या मुलांनी या पृथ्वीवरच प्राप्त केले पाहिजे. खरे तारण काय
आहे हे लोकांना न समजल्यामुळे या बाबतीत मोठ्या चुका झाल्या.
(क्रमशः…)
© 2026. Church of Light Emperor Emmanuel Zion. All rights reserved.